spot_img
spot_img
spot_img

हप्ता न दिल्याने हॉटेल मालकावर जीवघेणा हल्ला; ‘आताच जेलमधून सुटलो’ म्हणत दहशत, दोघांना अटक

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

काळेवाडीतील नढेनगर परिसरात हप्ता न दिल्याच्या कारणावरून हॉटेल मालक, व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करून हॉटेल मालकावर सिमेंटचा गड्डा फेकून जखमी केल्याची धक्कादायक घटना रविवारी (१९ जुलै) पहाटे घडली. याप्रकरणी काळेवाडी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश रेस्टॉरंट अँड बारसमोर आरोपींनी हॉटेलमधून घेतलेल्या तंदुरीचे पैसे मागितल्याचा राग मनात धरून गोंधळ घातला. “आम्ही आताच जेलमधून सुटलो आहोत. हॉटेल चालवायचे असेल तर दरमहा १० हजार रुपये हप्ता द्या, तसेच आम्ही आलो की दारू आणि जेवण मोफत द्या, अन्यथा हॉटेल चालू देणार नाही,” अशी धमकी आरोपींनी दिली.

हॉटेल मालकाने नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांच्यासह व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी एका आरोपीने सिमेंटचा गड्डा फेकून हॉटेल मालकाच्या हाताला दुखापत केली, तर दुसऱ्या आरोपीने “हप्ता दिला नाही तर जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिली.

या प्रकरणी महेश पोपट नढे (वय २९) यांनी फिर्याद दिली असून, काळेवाडी पोलिसांनी प्रतिक ऊर्फ बब्या गोरख भराटे (वय २३) आणि रोहित मानसिंग राठोड (वय २०) यांना अटक केली आहे. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!