पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
सायबर फसवणुकीसाठी बँक खाते उपलब्ध करून देत देशभरातील चार नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या खात्यातून तब्बल ८ लाख ८८ हजार ३८२ रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास गजानन भुजबळ (वय २६, रा. पिंपळे निलख) याने इतर अनोळखी साथीदारांसह संघटित सायबर गुन्हेगारी करण्याच्या उद्देशाने आयडीएफसी फर्स्ट बँकेचे खाते उघडून त्याचा वापर फसवणुकीसाठी केला. या खात्याद्वारे देशभरातील चार नागरिकांकडून एकूण १ लाख २७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११२(२), ६१(२), ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० मधील कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.


