पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
वाकड परिसरात बंद फ्लॅट फोडून लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत घरफोड्या अतुल ऊर्फ आट्या चंद्रकांत आमले (वय ३०) याला वाकड पोलिसांनी तीन साथीदारांसह अटक केली आहे. या कारवाईत घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आले असून आरोपींकडून ९७.८५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एकूण १० लाख ३४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उत्कर्ष चौक, वाकड येथील बंद फ्लॅट फोडून सुमारे ७.२० लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरी झाल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. तपास पथकाने तब्बल १० दिवसांतील १०० ते १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपीच्या हालचालींचा माग काढला. तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे इराणी कॅफे, वाकड परिसरातून अतुल ऊर्फ आट्या आमले याला अटक करण्यात आली.
तपासादरम्यान त्याचे साथीदार मोहन ऊर्फ आबा मुजमुले, भिमराव गंगावणे आणि रामेश्वर उपल्ले यांनाही वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात आली. चौकशीत या टोळीने वाकड परिसरातील अनेक घरफोड्या केल्याची कबुली दिली.
मुख्य आरोपी अतुल ऊर्फ आट्या आमले हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध पिंपरी-चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहिल्यानगर आणि लातूर येथे एकूण ४४ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून आणखी घरफोडीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, श्रीनिवास दराडे व वाकड पोलिसांच्या तपास पथकाने केली.


