spot_img
spot_img
spot_img

शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेर एकावर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला

शबनम न्यूज | प्रतिनिधी

विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण करणारी धक्कादायक घटना घडली आहे. शिवाजीनगर येथील न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ परिसरात भरदिवसा एका व्यक्तीवर गोळीबाराचा प्रयत्न करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात मंदार किवळे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या दोन्ही हातांवर कोयत्याने वार झाल्याची तसेच हात छाटल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले असून पोलिसांनी आरोपींची ओळख पटल्याची माहिती दिली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाच ते सहा जणांच्या टोळक्याने न्यायालय परिसरात संबंधित व्यक्तीला लक्ष्य केले. हल्लेखोरांपैकी एकाच्या हातात बंदूक होती, तर इतरांकडे कोयते होते. बंदूकधारी व्यक्ती इतरांना संरक्षण देत असताना तिघांनी जखमी व्यक्तीवर कोयत्याने वार केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हल्ल्यानंतर ‘आम्ही कात्रजचे भाई आहोत’ असे म्हणत हल्लेखोर घटनास्थळावरून निघून गेल्याची माहितीही समोर आली आहे.

या घटनेचे गांभीर्य प्रत्यक्षदर्शींच्या कथनातून अधिक स्पष्ट झाले आहे. हल्लेखोरांनी एका व्यक्तीवर कोयत्याने वार सुरू केले होते. त्यावेळी एका व्यक्तीच्या हातात बंदूक होती. मात्र, गोळीबार करण्यात आला नसून बंदुकीचा वापर केवळ धाक दाखवण्यासाठी करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. जखमी व्यक्तीला वाचवण्यासाठी नागरिकांनी १०८ रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क होऊ शकला नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

या घटनेमुळे न्यायालय परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. न्यायासाठी दररोज शेकडो नागरिक, वकील आणि पक्षकार न्यायालयात येत असतात. अशा संवेदनशील परिसरातच शस्त्रे घेऊन हल्लेखोर खुलेआम हल्ला करत असतील, तर सामान्य नागरिक आणि वकिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. येथील वकिलांनीही या घटनेनंतर न्यायालय परिसरातील सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. पुण्याची ओळख गुन्हेगारी आणि दहशतीचे शहर म्हणून होत चालली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात भरदिवसा शस्त्रांचा वापर करून हल्ला होणे, ही पुणेकरांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

न्यायालय हे सर्वसामान्य नागरिकांसाठी न्यायदानाचे मंदिर आहे. नागरिक न्याय आणि संरक्षणाच्या अपेक्षेने या ठिकाणी येतात. मात्र, त्याच न्यायमंदिराच्या परिसरात भरदिवसा रक्तरंजित हल्ला होत असेल, तर सामान्य नागरिकांनी सुरक्षेसाठी कोणाकडे पाहायचे, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे न्यायालय परिसरात पोलीस चौकी, सुरक्षा व्यवस्था आणि पोलिसांची सतत वर्दळ असतानाही हल्लेखोर शस्त्रे घेऊन येण्याचे धाडस करतात, ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलेला नाही का, असा सवाल करत त्यांनी शहरातील कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील बंदोबस्त वाढवला. हल्ल्यामागील नेमके कारण काय, हल्लेखोरांची संख्या किती आणि या घटनेचा पूर्ववैमनस्याशी काही संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.

 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!