शबनम न्यूज | प्रतिनिधी
सीएनजी भरण्यासाठी पेट्रोल पंपावर थांबलेल्या वाहनचालकाला वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना आळंदी शहरातील मरकळ रोडवरील गुंडरे पेट्रोल पंप परिसरात घडली. या मारहाणीत फिर्यादीच्या कानातील सोन्याची बाळी कोठेतरी पडून गहाळ झाली आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भगवान विनायक आंधळे (वय ३१, रा. आळंदी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादी हे सीएनजी भरण्यासाठी पेट्रोल पंपावर वाहन घेऊन थांबले होते. करण दत्तात्रय झगे हा वाहनाजवळ आला. त्याने फिर्यादीला पेट्रोल पंपावरून गाडी बाजूला घेण्यास सांगितले. यावर फिर्यादी यांनी गाडी का बाजूला घ्यायची, अशी विचारणा केली. याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच कॉलर पकडून वाहनातून ओढून बाहेर काढले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, विजय संजय लहाने, मोन्या ऊर्फ जय बाबाजी टुबे आणि त्यांच्यासोबत आणखी दोन अनोळखी इसम हे स्विफ्ट डिझायर कारमधून घटनास्थळी आले. त्यांनीही फिर्यादीला कोणतेही कारण नसताना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी आरोपी याने फिर्यादीला खाली पाडून त्यांच्या कमरेचा पट्टा काढला. पट्ट्याच्या लोखंडी बकलने त्यांच्या डोक्यात मारून जखमी केले. तसेच पुन्हा या परिसरात गाडी घेऊन दिसलास तर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. या मारहाणीत फिर्यादीच्या कानातील सोन्याची बाळी कोठेतरी पडून गहाळ झाली.
याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय संजय लहाने, करण दत्तात्रय झगे, मोन्या ऊर्फ जय बाबाजी टुबे आणि दोन अनोळखी इसमांचा तपासात समावेश आहे.




Total Users : 244198