शबनम न्यूज | प्रतिनिधी
‘तु डीसीपींना का फोन करायला लागला,’ असे म्हणत एका व्यक्तीला शिवीगाळ करून त्याच्या पोटाला पिस्तूल लावत जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना तळवडे येथील रूपीनगर परिसरात घडली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मेहबूब लियाकत शेख (वय ४२, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अमिन कबीर शेख, रशीद शेख (दोघेही रा. निगडी ओटास्किम, पुणे) आणि स्वप्निल वाघमारे (रा. गणेशनगर, तळवडे रोड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ नोव्हेंबर रोजी रात्री ११ ते १७ नोव्हेंबरदरम्यान माऊली हॉटेल, रूपीनगर, तळवडे येथे हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आरोपींनी फिर्यादीला उद्देशून अपशब्द वापरत शिवीगाळ केली. त्यानंतर एका आरोपीने शर्टच्या आत लपवलेले अग्निशस्त्रासारखे पिस्तूल बाहेर काढून फिर्यादीच्या पोटाला लावले. ‘तुमको ठोक दूंगा, तेरा बेटा उठाऊंगा, तेरे बच्चे को जीपीएस लगाओ’ अशा धमक्या दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकारामागे आरोपी क्रमांक एक आणि तीन यांच्यातील संबंध तसेच टोळीशी संबंधित असल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, आर्म्स ॲक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




Total Users : 241716