spot_img
spot_img
spot_img

येरवडा शासकीय जलतरण तलावातील घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा

आमदार अमित गोरखे यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे आक्रमक मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 येरवडा येथील शासकीय प्रादेशिक क्रीडा संकुलातील जलतरण तलावात बुधवार, दि. 30 सप्टेंबर रोजी पोहण्यासाठी गेलेल्या मुलांना अचानक उलट्या, मळमळ व अस्वस्थतेचा त्रास झाल्याची अत्यंत गंभीर घटना घडली. या दुर्घटनेत सुमारे 10 मुलांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. या अत्यंत गंभीर प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे केली आहे.

आरोग्याशी व जीविताशी खेळ
यापूर्वीच, दि. 27  जुलै 2026 रोजी आमदार अमित गोरखे यांनी पुणे विभागीय आयुक्तांकडे संबंधित क्रीडा संकुलातील प्रशासकीय अनास्था व कार्यपद्धतीशी संबंधित बाबींवर सखोल तपासणी व कारवाईची मागणी केली होती. मात्र, त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीतच मुलांच्या आरोग्याशी व जीविताशी खेळ करणारी ही घटना घडल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या तक्रारी व सूचनांवर संबंधित प्रशासनाने नेमकी काय कार्यवाही केली, याची कसून चौकशी होणे गरजेचे आहे.

दुर्लक्ष झाले असल्यास जबाबदारी निश्चित करा
आमदार अमित गोरखे यांनी याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. 27  जुलै रोजी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेल्या बाबींवर प्रत्यक्षात कोणती कार्यवाही झाली? कोणत्या अधिकाऱ्याने काय उपाययोजना केल्या? याची सविस्तर नोंद व स्वतंत्र तपास व्हावा. तलावातील क्लोरीन व अन्य रसायनांचे प्रमाण, डोसिंग यंत्रणा, साठवणूक व हाताळणी, पाण्याची नियमित प्रयोगशाळा तपासणी, तपासणी अहवाल, लॉगबुक, प्रशिक्षित कर्मचारी, लाइफगार्ड, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षा प्रोटोकॉलची सखोल तपासणी करण्यात यावी. घटनेच्या दिवशी तलावातील पाण्याचे नमुने घेऊन त्यांची स्वतंत्र प्रयोगशाळेत तपासणी करण्यात यावी आणि त्याचे अहवाल तातडीने सार्वजनिक करण्यात यावेत.

कठोर कारवाई करा
उपसंचालक स्तरावर अथवा इतर कोणत्याही स्तरावर कर्तव्यात कसूर, निष्काळजीपणा किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी केली आहे. ‘शासकीय जलतरण तलावामध्ये विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने येतात. त्यांच्या जीविताशी व आरोग्याशी संबंधित सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड होऊ नये. 30 सप्टेंबरची घटना ही केवळ एक स्वतंत्र घटना म्हणून न पाहता, या केंद्रातील संपूर्ण सुरक्षा व प्रशासकीय व्यवस्थेचे ऑडिट केले पाहिजे. यापूर्वी या स्विमिंग पूलमध्ये एका व्यक्तीचा मृत्य देखील झाला आहे ,’ असे आमदार अमित गोरखे यांनी सांगितले.

शासकीय जलतरण तलावामध्ये विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने येतात. त्यांच्या जीविताशी व आरोग्याशी संबंधित सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत हा लढा सुरूच राहील.

–  आमदार अमित गोरखे

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!