हस्तकलेतून स्वयंरोजगाराची संधी; बेसिक ते ॲडव्हान्स प्रशिक्षणासह मोफत साहित्य व प्रमाणपत्र
शबनम न्यूज | प्रतिनिधी
काळभोरनगर परिसरातील महिला आणि तरुणांना हस्तकलेच्या माध्यमातून स्वयंरोजगाराची नवी संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘सेवा संकल्प अभियान’ यांच्या वतीने पाईप क्लिनर क्राफ्ट वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्कशॉपमध्ये बेसिक ते ॲडव्हान्स क्राफ्टचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, प्रशिक्षणार्थींना विविध आकर्षक आणि उपयुक्त वस्तू तयार करण्याचे तंत्र शिकविले जाणार आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच युवा नेते मयूर काळभोर यांच्या वतीने ‘दिवाळी स्पेशल पाईप क्लिनर वर्कशॉप’ आयोजित करण्यात आले आहे. या माध्यमातून महिलांना आणि तरुणांना घरबसल्या हस्तकलेच्या वस्तू तयार करून त्यांचे व्यावसायिक रूपांतर करण्यासाठी मार्गदर्शन मिळणार आहे.
वर्कशॉपमध्ये पाईप क्लिनरच्या सहाय्याने शुभ लाभ, कमळ आसन, टी-होल्डर, लटकन माळ, आकाश कंदील यांसारख्या विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच बेसिकपासून पुढे जात क्लिष्ट डिझाइन्स, क्रिएटिव्ह आर्ट आणि व्यावसायिक स्तरावर तयार करता येणाऱ्या विविध शोभेच्या व गृहोपयोगी वस्तूंचे तंत्रही शिकविले जाणार आहे.
वर्कशॉपमध्ये सुरुवातीला पाईप क्लिनर हाताळण्याच्या मूलभूत पद्धती, त्यापासून विविध आकार व डिझाईन तयार करण्याचे तंत्र शिकविले जाईल. त्यानंतर ॲडव्हान्स प्रशिक्षणामध्ये अधिक आकर्षक आणि क्लिष्ट कलाकृती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे हस्तकलेची आवड असलेल्या तसेच या कलेचा व्यवसाय करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे.
विशेष म्हणजे प्रशिक्षणासाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच वर्कशॉप पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
हे वर्कशॉप ५ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत तीन दिवस घेण्यात येणार आहे. दररोज दुपारी १ ते ४ या वेळेत प्रशिक्षण होईल. वर्कशॉपचे आयोजन विठ्ठल मंदिर, काळभोरनगर, चिंचवड, पुणे-१९ येथे करण्यात आले आहे.
महिला व तरुणांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन हस्तकलेचे कौशल्य आत्मसात करावे आणि त्यातून स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




Total Users : 227890