शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये झोपडपट्टी सेवा कर संकलनासाठी ऑनलाइन सुविधेचा प्रभावी वापर करण्यात येत असून, झोपडपट्टीवासीयांचा या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ऑनलाइन माध्यमातून ४२२ पावत्यांद्वारे १२ लाख ४९ हजार ७६२ रुपयांचा सेवा कर जमा झाला आहे.
तर १ एप्रिल २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमांतून एकूण ८३१ पावत्यांद्वारे २६ लाख १५ हजार २७१ रुपयांचा झोपडपट्टी सेवा कर महापालिकेकडे जमा झाला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने यंदा सेवा कर भरण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. यामध्ये ऑनलाइन सुविधेला चांगला प्रतिसाद मिळाला. ऑनलाइन सुविधेमुळे कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेळेची बचत करणारी ठरली. ऑनलाइन पद्धतीने कर भरणाऱ्यांची संख्या वाढत असून, नागरिकांना डिजिटल माध्यमातून सेवा कर भरण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.
पहिल्या सहामाहीची विक्रमी वसुली
झोपडपट्टी सेवा कर संकलन अधिक प्रभावी करण्यासाठी ऑनलाइन सुविधांचा विस्तार, नागरिकांमध्ये जनजागृती, कर भरण्यासाठी उपलब्ध सुविधांची माहिती पोहोचविणे तसेच थकबाकी वसुलीचा नियमित आढावा घेण्यावर झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाकडून विशेष भर देण्यात आला. त्यामुळे यंदा आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत विक्रमी वसुली झाली आहे. यापूर्वी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये २५ लाख ३७ हजार २४८ रुपये, २०२३-२४ मध्ये २५ लाख २७ हजार ३८८ रुपये, २०२४-२५ मध्ये १० लाख १४ हजार ९६७ रुपये वसुली झाली होती. तर यावर्षी म्हणजेच २०२६-२७ च्या पहिल्या सहामाहीत २६ लाख १५ हजार २७१ रुपयांचा सेवा कर जमा झाला आहे.
महिला सक्षमीकरणाला चालना
महिला बचत गटातील महिलांमार्फत झोपडपट्टी सेवा कराची बिले वाटप करण्यात येत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये सेवा कर भरण्याबाबत जनजागृती होत असून, झोपडपट्टीतील महिलांना रोजगाराची संधीही उपलब्ध होत आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम यशस्वी ठरत आहे.
झोपडपट्टी सेवा कराची वसुली अधिक प्रभावी करण्यासाठी ऑनलाइन सुविधांचा विस्तार, करदात्यांमध्ये जनजागृती आणि थकबाकी वसुलीचा सातत्याने आढावा घेण्यात येत आहे. पहिल्या सहामाहीत झालेली २६ लाख १५ हजार रुपयांची वसुली ही या प्रयत्नांना मिळालेला सकारात्मक प्रतिसाद आहे. करदात्यांना सुलभ पद्धतीने सेवा कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देत वसुली प्रक्रिया अधिक गतिमान करण्यावर महापालिकेचा भर राहणार आहे.
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
झोपडपट्टी सेवा कर भरण्याची प्रक्रिया नागरिकांसाठी अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी महापालिकेकडून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ऑनलाइन पद्धतीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांना घरबसल्या सेवा कर भरणे शक्य झाले आहे. या सुविधेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, यासाठी आवश्यक जनजागृती आणि मार्गदर्शन करण्यात येत आहे.
– तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
झोपडपट्टी सेवा कर संकलनासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ८३१ पावत्यांद्वारे २६ लाख १५ हजार २७१ रुपयांचा सेवा कर जमा झाला आहे. करदात्यांपर्यंत आवश्यक माहिती पोहोचविणे, कर भरण्यासाठी उपलब्ध सुविधांची माहिती देणे आणि थकबाकीचा नियमित आढावा घेणे यामुळे वसुली प्रक्रियेला अधिक गती मिळत आहे. आगामी काळातही सेवा कर संकलन वाढविण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्यात येईल.
– अण्णा बोदडे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका




Total Users : 227901