spot_img
spot_img
spot_img

महिला व स्टार्टअप उद्योजकांना महागड्या प्रदर्शनांचा आर्थिक भार

मोफत किंवा अनुदानित प्रदर्शन केंद्रे उपलब्ध करून देण्याची अभय भोर यांची शासनाकडे मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महिला उद्योजक आणि स्टार्टअप्सना आपल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तसेच ग्राहक, वितरक आणि गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रदर्शनांमध्ये सहभागी होणे महत्त्वाचे ठरत आहे. मात्र, प्रदर्शनांमधील स्टॉलचे वाढते भाडे, सजावट, वाहतूक, मनुष्यबळ आणि इतर खर्च नवउद्योजकांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. त्यामुळे महिला उद्योजक व स्टार्टअप्सना मोफत किंवा अनुदानित दरात प्रदर्शन केंद्रे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी शासनाकडे केली आहे.

आजच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत केवळ उत्पादनाची गुणवत्ता आणि नावीन्य पुरेसे नसून, त्याचे प्रभावी सादरीकरण आणि योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रदर्शनांच्या माध्यमातून उद्योजकांना ग्राहक, वितरक, गुंतवणूकदार तसेच मोठ्या कंपन्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळते. मात्र, मोठ्या शहरांमध्ये होणाऱ्या प्रदर्शनांमध्ये स्टॉलसाठी आकारले जाणारे शुल्क, त्यासोबतची सजावट व अन्य खर्च यामुळे अनेक लघुउद्योजकांना सहभागी होणे आर्थिकदृष्ट्या कठीण होत आहे.

महिला उद्योजकांकडे अनेकदा व्यवसायाच्या सुरुवातीच्या टप्प्यात मर्यादित भांडवल असते. उत्पादन निर्मिती, पॅकेजिंग, मार्केटिंग आणि व्यवसाय विस्तारासाठी निधी खर्च होत असल्याने प्रदर्शनासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करणे त्यांना शक्य होत नाही. त्याचप्रमाणे स्टार्टअप्सनाही सुरुवातीच्या काळात भांडवलाची कमतरता भासत असल्याने महागड्या प्रदर्शनांपासून त्यांना दूर राहावे लागते.

या पार्श्वभूमीवर शासनाने जिल्हानिहाय कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्रे उभारावीत, अशी मागणी अभय भोर यांनी केली आहे. या केंद्रांमध्ये महिला बचतगट, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, स्टार्टअप्स आणि नवउद्योजकांना मोफत किंवा सवलतीच्या दरात स्टॉल उपलब्ध करून द्यावेत. तसेच प्रदर्शनांच्या आयोजनासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करून स्थानिक स्वराज्य संस्था आणि औद्योगिक संघटनांच्या सहकार्याने नियमित प्रदर्शनांचे आयोजन करावे, असेही त्यांनी सुचविले आहे.

अशा प्रकारच्या सुविधांमुळे नवउद्योजकांना आपल्या उत्पादनांसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध होईल. स्थानिक उत्पादनांना व्यापक ग्राहकवर्ग मिळण्यासोबतच व्यवसाय विस्तार, रोजगारनिर्मिती आणि महिला आर्थिक सक्षमीकरणालाही चालना मिळू शकते. त्यामुळे शासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून महिला आणि स्टार्टअप उद्योजकांसाठी सुलभ व परवडणारी प्रदर्शन व्यवस्था निर्माण करावी, अशी अपेक्षा अभय भोर यांनी व्यक्त केली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!