spot_img
spot_img
spot_img

एशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला तिरंदाजी संघाचा सुवर्णवेध; पिंपरी-चिंचवडच्या प्रिथिका प्रदीपची ऐतिहासिक कामगिरी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

एची-नागोया एशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला कंपाऊंड धनुर्विद्या संघाने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. अंतिम सामन्यात भारताने बलाढ्य चीन संघाचा 238-234 अशा गुणांनी पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयात पिंपरी-चिंचवडची कन्या प्रिथिका प्रदीप हिने महत्त्वपूर्ण योगदान देत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

भारतीय महिला संघात प्रिथिका प्रदीप, ज्योती सुरेखा वेन्नम आणि चिकिता तनीपार्थी यांचा समावेश होता. अंतिम सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासूनच अचूक निशाणेबाजीचे प्रदर्शन करत चीनवर वर्चस्व राखले. भारताचा 238 गुणांचा अंतिम स्कोअर हा दक्षिण कोरियाने 2014 मध्ये नोंदवलेल्या जागतिक विक्रमाशी बरोबरी करणारा ठरला.

उपांत्य फेरीत भारताने दक्षिण कोरियाचा 234-233 अशा अत्यंत चुरशीच्या लढतीत पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर अंतिम सामन्यातही भारतीय महिला तिरंदाजांनी संयम आणि कौशल्याचे दर्शन घडवत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली.
विशेष म्हणजे, भारतीय महिला कंपाऊंड संघाने एशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ज्योती सुरेखा वेन्नम यांचे हे एशियाई क्रीडा स्पर्धेतील चौथे सुवर्णपदक ठरले, तर प्रिथिका प्रदीप आणि चिकिता तनीपार्थी यांनी आपल्या पहिल्याच एशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा मान मिळवला.

पिंपरी-चिंचवडसाठी अभिमानाचा क्षण..

प्रिथिका प्रदीपच्या या यशामुळे पिंपरी-चिंचवड शहराचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात अभिमानाने झळकले आहे. शहरातील पिंपरी-चिंचवड आर्चरी असोसिएशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या धनुर्विद्या विकासाच्या प्रयत्नांना या यशामुळे नवी दिशा आणि प्रेरणा मिळाली आहे.
पिंपरी-चिंचवडमधून घडलेली खेळाडू एशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून सुवर्णपदक जिंकते, ही संपूर्ण शहरासाठी गौरवाची बाब मानली जात आहे. तिच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्रासह देशभरातील युवा धनुर्धारकांना प्रेरणा मिळणार आहे.
प्रिथिकाच्या यशामागे प्रशिक्षक कुणाल टावरे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, तांत्रिक प्रशिक्षण आणि मेहनत महत्त्वाची ठरली आहे. तसेच तिच्या पालकांनी दिलेला पाठिंबा, विश्वास आणि प्रोत्साहन हेही तिच्या यशाचे प्रमुख आधारस्तंभ मानले जात आहेत.

सोनल बुंदेले यांची प्रतिक्रिया..

महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या सहसचिव तथा पिंपरी-चिंचवड आर्चरी असोसिएशनच्या सचिव सोनल बुंदेले यांनी प्रिथिकाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत सांगितले की, “प्रिथिकाची गुणवत्ता आणि तिच्यातील विशेष टॅलेंट शालेय वयात असतानाच ओळखण्याची संधी मला मिळाली होती. तिची जिद्द, मेहनत, शिकण्याची तयारी आणि खेळाप्रती असलेली निष्ठा आज एशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकापर्यंत पोहोचली आहे, याचा अभिमान वाटतो. तिचे हे यश पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र आणि भारतासाठी गौरवाची बाब आहे. या यशामुळे अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल.”

त्या पुढे म्हणाल्या, “प्रिथिकाची मेहनत, प्रशिक्षक कुणाल टावरे यांचे मार्गदर्शन आणि तिच्या पालकांचा भक्कम पाठिंबा यामुळेच हे यश शक्य झाले आहे. भविष्यातही पिंपरी-चिंचवड आर्चरी असोसिएशनच्या माध्यमातून गुणवंत खेळाडूंना योग्य प्रशिक्षण आणि संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.”

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!