spot_img
spot_img
spot_img

2.77 कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

कोट्यात 1.40 कोटींचे मशीन, मग पिंपरी-चिंचवडमध्ये 2.77 कोटींची निविदा का?; संदीप वाघेरे यांची आयुक्तांकडे निविदा रद्द करण्याची मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी काढण्यात आलेल्या GeM निविदा क्र. GEM/2026/B/7797530 मधील 1000 MA Digital Radiography System च्या खरेदीवरून आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या मशीनसाठी महापालिकेने तब्बल 2 कोटी 77 लाख 56 हजार रुपयांचे अंदाजपत्रकीय मूल्य निश्चित केले असून, बाजारातील तसेच इतर शासकीय संस्थांमधील खरेदी दरांच्या तुलनेत ही रक्कम मोठी असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य संदीप वाघेरे यांच्या वतीने महापालिका आयुक्तांना याबाबत पत्र देण्यात आले आहे.

संबंधित निविदा प्रक्रिया तातडीने थांबवून रद्द करावी, तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

पत्रात नमूद केलेल्या माहितीनुसार, निविदेतील तांत्रिक स्पेसिफिकेशनशी संबंधित मूळ उत्पादक कंपनीने राजस्थानमधील कोटा येथील वैद्यकीय महाविद्यालयाला 1000 MA क्षमतेचे याच प्रकारचे मशीन सुमारे 1 कोटी 40 लाख रुपयांना पुरविले आहे. तसेच 800 MA क्षमतेचे मशीन याच वर्षी सुमारे 1 कोटी 10 लाख रुपयांना विकण्यात आले असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
एकीकडे 1000 MA मशीनची शासकीय संस्थेतील खरेदी सुमारे 1.40 कोटी रुपयांत झाल्याचे नमूद असताना, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निविदेत त्याच क्षमतेच्या मशीनसाठी 2.77 कोटी 56 लाख रुपये इतके अंदाजित मूल्य निश्चित करण्यात आल्याने दरातील मोठ्या फरकाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
निविदेतील तांत्रिक अटींवरही आक्षेप
या निविदेतील तांत्रिक अटी व स्पेसिफिकेशन काही ठराविक कंपन्या किंवा पुरवठादारांना अनुकूल ठरतील अशा पद्धतीने निश्चित करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे निविदेतील प्रत्येक तांत्रिक निकष, अंदाजपत्रकीय दर आणि त्यासाठी वापरण्यात आलेला बाजारभाव यांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच संबंधित उत्पादक कंपनीच्या काही सरकारी संस्थांमधील विक्री व्यवहारांबाबत तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने सदर खरेदी प्रक्रियेबाबत अधिक दक्षता घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

“महापालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार नको”

महापालिकेच्या सार्वजनिक निधीतून कोट्यवधी रुपयांची खरेदी होत असल्याने निविदा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, स्पर्धात्मक आणि बाजारभावाच्या आधारे असणे आवश्यक आहे. त्यामुळे GEM/2026/B/7797530 ही निविदा तत्काळ स्थगित करून रद्द करावी, संबंधित मशीनचे पूर्वीचे शासकीय खरेदी दर तपासावेत आणि नव्याने बाजारभाव निश्चित करूनच पुढील खरेदी प्रक्रिया राबवावी, अशी मागणी संदीप वाघेरे यांनी केली आहे.
या प्रकरणात महापालिका प्रशासन आता कोणती भूमिका घेते आणि 2.77 कोटी रुपयांच्या अंदाजित दराचे समर्थन कोणत्या आधारावर केले जाते, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!