शबनम न्यूज | प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेचा अनुभव घेत विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. यावेळी अनिल कुमार दास यांनी प्राचार्यांची भूमिका बजावत मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “आजचा दिवस हा शिक्षकांचा सन्मान करण्याचा दिवस आहे.”
कार्यक्रमात अजय थेरोडकर, पूनम तोरडमल, नीर चांदणे आणि मैथिली शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयीच्या भावना व्यक्त करत शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रभंजन चव्हाण होते. मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेची स्थापना करणारे कर्मवीर भाऊराव पाटील हे खऱ्या अर्थाने महान शिक्षक होते. संत, महापुरुष तसेच आई-वडील हे आपल्या जीवनातील खरे मार्गदर्शक असतात. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे हे शिक्षकांचे महत्त्वाचे कार्य आहे.
रयत शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखड्याचा केंद्रबिंदू विद्यार्थी असून, नियमितपणे महाविद्यालयात उपस्थित राहून विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास अधिक चांगल्या प्रकारे होतो, असेही त्यांनी नमूद केले.
शेतकरी आणि कष्टकरी समाजाच्या जीवनातील वास्तव समजून घेण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) सारख्या उपक्रमांचे महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे हीच खरी संपत्ती असून, भारतीय संविधानाने देशात समतेचा विचार रुजविला आहे, असे प्रतिपादन डॉ. चव्हाण यांनी केले. नैतिकतेच्या पायावर जीवन उभे करणे आणि नम्रता जपणे, हा शिक्षक दिनाच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी संदेश घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी बनसोडे आणि आकांक्षा शेलार यांनी केले. उपस्थितांचे आभार मानसी बनसोडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. कुशल पाखले, प्रा. गौरी माळी तसेच सांस्कृतिक विभागातील इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील ७१ विद्यार्थी उपस्थित होते.










Total Users : 219703