spot_img
spot_img
spot_img

एमडी अन् अफीम तस्करीचा पर्दाफाश; दोन आरोपी जेरबंद

प्रतिनिधी युनूस खतीब पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड, दि. ४ सप्टेंबर : पिंपरी-चिंचवड शहरात अंमली पदार्थांची अवैध विक्री व तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेने मोशी परिसरात केलेल्या कारवाईत आंतरराज्य एमडी (मेफेड्रॉन) व अफीम तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७१ ग्रॅम ७२० मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एमडी), १०८ ग्रॅम ७३० मिलीग्रॅम अफीम, दोन मोबाईल, डिजिटल वजनकाटा आणि दुचाकी असा एकूण ४ लाख ३० हजार २५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थांची अवैध विक्री रोखून त्याचे समूळ उच्चाटन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-२ सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी विविध पथके तयार केली आहेत.

दरम्यान, पथक शहर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार विजय दौंडकर यांना अंमली पदार्थ तस्करीबाबत माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रियदर्शनी शाळेसमोर, देहू-मोशी रोडवरील महालक्ष्मी फर्निचर दुकानासमोर, बोराटेवस्ती, मोशी येथे पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.

या कारवाईत आकाश कुमार भेराराम बिश्नोई (वय २१, रा. दुर्गापार्क, सस्तेवाडी, मोशी; मूळ रा. सरवाणा, ता. सांचोर, जि. जालोर, राजस्थान) याच्याकडून ७१.७२० ग्रॅम एमडी, तर प्रविण कुमार हिराराम बिश्नोई याच्याकडून १०८.७३० ग्रॅम अफीम जप्त करण्यात आले. दोघेही अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या वाहतूक व बाळगत असल्याचे पोलिसांच्या कारवाईत निष्पन्न झाले.

दोघांविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यातील कलम ८(क), १७(ब), २२(क) व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक जिलानी मोमीन, पोलीस हवालदार विजय दौंडकर, निखिल शेटे, पोलीस शिपाई कपिलेश इगवे, संतोष सपकाळ, सुभाष गुरव आणि प्रतिक कवडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवणार

अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले असून, अशा कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार आहेत. नागरिकांना अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा तस्करीबाबत माहिती मिळाल्यास अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेच्या कार्यालयाशी किंवा ७७९८१००११२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!