शबनम न्यूज | प्रतिनिधी
महिला व युवतींमध्ये सामाजिक कार्याची आवड निर्माण करण्याबरोबरच जलसंवर्धन, पर्यावरण संवर्धन, संस्कृतीचे जतन, पारंपरिक सण-उत्सवांचे आयोजन तसेच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गृहउद्योग व कुटिरोद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने माई सोशल फाऊंडेशनची स्थापना काळभोरनगर येथे करण्यात आली. गोकुळाष्टमीच्या पूर्वसंध्येला झालेल्या सभेत फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी अनुराधा काळभोर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी विविध वाद्यसंगीताच्या प्रशिक्षक व संगीतविशारद प्रांजली पाटेकर होत्या. अध्यक्षीय भाषणात प्रांजली पाटेकर यांनी महिलांनी आपल्या अंगी असलेल्या कला, गुण आणि कौशल्यांना समाजासमोर आणावे, तसेच विविध छंद जोपासून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा, असे आवाहन केले.
फाऊंडेशनच्या नूतन अध्यक्ष अनुराधा काळभोर यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रात महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, कार्यक्रमात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील महिला सदस्यांचे वाढदिवस उत्साहात साजरे करण्यात आले. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या सभेचे नियोजन सोनाली काळे, नेहा कालेकर, प्राची काळभोर आणि शिल्पा भालेराव यांनी केले.










Total Users : 219385