पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी युनूस खतीब
आळंदी, मरकळ, भानोबाची कोयाळी व वडगाव घेनंद परिसरातील विद्युत डीपी फोडून तांब्याच्या व अॅल्युमिनियमच्या तारा लंपास करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट-३ने पर्दाफाश केला. या कारवाईत चौघांना अटक करून १६ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तब्बल सात गुन्ह्यांची उकल झाली असून चोरीस गेलेला १०० टक्के माल हस्तगत करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अक्षय बाबासाहेब काळे (३४), राहुल दिनकर पोकळे (२०), ईजहार इस्माईल चौधरी (४०) आणि ब्रिजमोहन असर्फीलाल प्रजापती (३०) यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी ललित मगर ऊर्फ नेपाळ्या याच्यासह डीपीमधून तारा चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींकडून ५ लाख १० हजार रुपयांच्या तांब्याच्या व अॅल्युमिनियमच्या तारा, तसेच चोरीसाठी वापरलेली तीन वाहने जप्त करण्यात आली. या कारवाईत आळंदी व चाकण दक्षिण पोलीस ठाण्यांतील सात गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सूचनेनुसार, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे व युनिट-३च्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली.










Total Users : 219703