शबनम न्यूज | प्रतिनिधी
पैगंबर-ए-इस्लाम हजरत मुहम्मद ﷺ यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या ईद-ए-मिलादुन्नबीच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भोसरी येथे पोलीस प्रशासन आणि मुस्लिम समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्सव शांततेत, शिस्तीत आणि सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठी यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीस DCP झोन-3 श्री. मारुती जगताप, ACP भोसरी MIDC विभाग सुधाकर यादव, भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नाथा घार्गे, भोसरी वाहतूक विभागाचे PI विश्वनाथ चव्हाण, गोपनीय अंमलदार अतिश मरगले, पोलीस हवालदार प्रमोद गरजे यांच्यासह तौफीक खान, मन्सूर शेख आणि भोसरीतील मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी DCP मारुती जगताप आणि ACP सुधाकर यादव यांचा भोसरीतील मुस्लिम समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अल्पसंख्याक आघाडीचे सरचिटणीस मा. खाजाभाई शेख आणि इरफान शेख यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
ईद-ए-मिलादुन्नबीचा कार्यक्रम शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनीही प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली. सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था कायम ठेवत उत्सव साजरा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.




Total Users : 239862