spot_img
spot_img
spot_img

चाकण MIDC मधील ट्रक पार्किंगच्या प्रश्नावर आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

चाकण औद्योगिक वसाहतीतील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांवर उभी राहणारी अवजड वाहने आणि त्यामुळे निर्माण होणारा अपघातांचा धोका या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा बांधकाम समिती सदस्य गणेश कांताराम बोत्रे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाहतूक सेलने जाहीर पाठिंबा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाहतूक सेलचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विनोद शंकरराव वरखडे पाटील यांनी १८ ऑगस्ट २०२६ रोजी गणेश बोत्रे यांना पत्र देत या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. नागरिकांच्या मूलभूत सुविधा, प्रलंबित मागण्या आणि त्यांच्या हक्कांसाठी सुरू करण्यात आलेल्या उपोषणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

चाकण MIDC परिसरात मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची ये-जा होत असून स्वतंत्र ट्रक पार्किंगची सुविधा नसल्याने अनेक ट्रक रस्त्याच्या कडेला उभे केले जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीबरोबरच अपघाताचा धोका वाढत असल्याचा मुद्दा आंदोलनातून उपस्थित करण्यात आला आहे. चाकण परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या यापूर्वीही सातत्याने समोर आली असून पर्यायी बाह्यवळण मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

चाकण MIDC परिसरातील वाहतूक कोंडीमुळे उद्योग, कामगार आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे अलीकडील वृत्तांतूनही समोर आले आहे. काही मार्गांवर काही किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.

“नागरिकांच्या हिताच्या मागण्यांवर प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा आणि संबंधित प्रशासनाने तातडीने चर्चा करून योग्य तो तोडगा काढावा,” अशी भूमिका विनोद वरखडे पाटील यांनी पत्राद्वारे मांडली आहे.

दरम्यान, “ट्रक पार्किंगची व्यवस्था कधी होणार?” असा सवाल उपस्थित करत गणेश बोत्रे यांच्या आंदोलनामुळे चाकण MIDC मधील अवजड वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!