पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
मागील वर्षी दिलेले पाच हजार रुपये परत कधी देणार, अशी विचारणा केल्याच्या कारणावरून भाजी विक्रेत्याला शिवीगाळ करत बांबूने मारहाण केल्याची घटना आळंदीतील भाजी मंडई परिसरात घडली. भावाला वाचवण्यासाठी आलेल्या त्याच्या भावालाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार मोहन कोळेकर (वय २६, रा. कोयाळी) हे ११ ऑगस्ट रोजी दुपारी वडगाव रोडवरील भाजी मंडईत शेपुची भाजी विक्री करत होते. त्यावेळी गावातील अक्षय कृष्णा कोळेकर (वय २७) याला मागील वर्षी दिलेले पाच हजार रुपये परत कधी देणार, अशी विचारणा केली.
याचा राग आल्याने अक्षय याने तुषार यांना शिवीगाळ करून बांबूने मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. तुषार यांना वाचवण्यासाठी त्यांचा चुलत भाऊ चैतन्य कोळेकर धावून आला असता त्यालाही शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली.
दरम्यान, तुषार घरी जात असताना वडगाव घाटात आरोपी अक्षयचा भाऊ कृणाल कोळेकर (वय २५) याने त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





Total Users : 213303