शबनम न्यूज | प्रतिनिधी
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर, राष्ट्रीय श्रमिक आघाडी आणि संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादित यांच्या वतीने उद्या, १५ ऑगस्ट रोजी संत तुकाराम नगर येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार आयोजित या रॅलीत शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी केले.
रॅलीला दुपारी ३ वाजता संत तुकाराम नगर येथील राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या कार्यालयापासून सुरुवात होणार आहे. गंगानगर, महेशनगर, ॲटलॉस कॉलनी, डी. वाय. पाटील हॉस्पिटल, वायसीएम हॉस्पिटल, आचार्य अत्रे रंगमंदिर या मार्गाने सुमारे तीन किलोमीटरचा प्रवास करून रॅली पुन्हा सभेच्या ठिकाणी पोहोचणार आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत रॅलीची सांगता होऊन त्यानंतर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या रॅलीसाठी भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, चिंचवडचे आमदार शंकरशेठ जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे, विधान परिषद सदस्य उमा खापरे, आमदार अमित गोरखे, महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, गटनेते प्रशांत शितोळे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.
यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, “तिरंगा हा आपल्या देशाच्या अभिमानाचे प्रतीक आहे. हा तिरंगा अभिमानाने फडकत राहावा यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यांच्या त्यागाचे स्मरण करून राष्ट्राला अभिवादन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.”
गेली ३० वर्षे १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यंदा या परंपरेला व्यापक स्वरूप देत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड ही कामगारनगरी असल्याने शहरातील कामगार, विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भोसले यांनी केले.
रॅलीमध्ये एक हजारांहून अधिक नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा असून सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे. “१५ ऑगस्ट हा केवळ सुट्टीचा दिवस नसून राष्ट्राच्या स्वाभिमानाला अभिवादन करण्याचा दिवस आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण करून प्रत्येक नागरिकाने तिरंगा रॅलीत सहभागी व्हावे,” असे आवाहन यशवंतभाऊ भोसले यांनी केले.





Total Users : 213315