पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
“तुम्हाला ६० कोटी रुपयांची टर्म इन्शुरन्स पॉलिसी मिळणार असून तत्काळ २ ते ३ लाख रुपये मिळतील,” असे आमिष दाखवून तळवडे येथील एका नागरिकाची तब्बल ३० लाख २५ हजार ९२६ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी इंद्रजित विजयसिंह भोसले (वय ५१, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पंकज तिवारी (रा. नवी दिल्ली) याने स्वतःला “बीमा लोकपाल, दिल्ली” कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून फिर्यादींशी संपर्क साधला. ६० कोटी रुपयांच्या टर्म इन्शुरन्स पॉलिसीचे आमिष दाखवत तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांना विमा संरक्षण मिळणार असल्याचे खोटे आश्वासन दिले. त्यानंतर विविध कारणे सांगून वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास भाग पाडले.
डिसेंबर २०२४ ते एप्रिल २०२६ या कालावधीत फिर्यादींकडून ३०.२५ लाख रुपये ऑनलाइन स्वरूपात उकळून आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत.


