पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
भोसरी एमआयडीसीतील कोट्यवधी रुपयांच्या औद्योगिक मालमत्ता व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी एका दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल २ कोटी ९५ लाख रुपयांहून अधिक रक्कम स्वीकारूनही खरेदीखत पूर्ण न करता फसवणूक, दमदाटी व शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१६/२०२६ दाखल करण्यात आला असून हरबनसिंग जब्बल (वय ७७) आणि जसविंदर कौर जब्बल (वय ७४, रा. निगडी प्राधिकरण) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जे-ब्लॉक, एमआयडीसी भोसरी येथील १४२८ चौरस मीटर क्षेत्रफळाची औद्योगिक मालमत्ता आणि इमारत २०२२ मध्ये ५ कोटी रुपयांना विक्री करण्याचे ठरले होते. त्यासाठी फिर्यादींकडून वेळोवेळी २ कोटी ४५ लाख रुपये देण्यात आले होते. मात्र, संबंधित मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीला विक्रीसाठी काढल्याचे जाहीर नोटिशीतून समोर आले.
यानंतर पुन्हा ६ कोटी रुपयांना व्यवहार निश्चित करून सप्टेंबर २०२४ मध्ये खरेदी दस्तही करण्यात आला. त्यानुसार फिर्यादींकडून २ कोटी ९५ लाख ५ हजार रुपये देण्यात आले. तरीही आरोपींनी व्यवहार पूर्ण होऊ नये यासाठी खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप आहे.
तसेच उर्वरित रक्कम स्वीकारू नये म्हणून बँक खाते तात्पुरते बंद करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही आरोपी खरेदीखत करण्यास टाळाटाळ करत असून दमदाटी व शिवीगाळ करीत असल्याचा आरोप फिर्यादींनी केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.


