पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
भारतीय रेल्वे आणि वन विभागात सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तिघांकडून तब्बल २१ लाख ८७ हजार ७३ रुपये उकळून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम पवार (रा. जालना) आणि निलेश वाकचौरे (रा. संगमनेर) यांच्यासह इतर साथीदारांनी फिर्यादी हितेश कुलकर्णी तसेच दोन साक्षीदारांना रेल्वे व वन विभागात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
आरोपींनी हितेश कुलकर्णी यांच्याकडून ७.८७ लाख रुपये, अंकुश राठोड यांच्याकडून ४.३० लाख रुपये आणि प्रशांत जाधव यांच्याकडून ९.७० लाख रुपये अशी एकूण २१.८७ लाख रुपयांची रक्कम घेतली. त्यानंतर संबंधितांना बनावट जॉइनिंग लेटर आणि इतर खोटी कागदपत्रे देऊन दिशाभूल करण्यात आली.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितांनी काळेवाडी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
सरकारी नोकरीच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीच्या प्रकारांबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.




Total Users : 227482