पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
खराबवाडी परिसरात विनापरवाना व्यावसायिक गॅस सिलिंडरची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीवर दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत गॅस सिलिंडर आणि टेम्पोसह सुमारे २ लाख ६९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगणे चौक ते सारासिटी रस्त्यावर फातिमा चिकन सेंटरसमोर पहाटेच्या सुमारास संशयित टेम्पोची तपासणी करण्यात आली. त्यावेळी चालक शेखर किशोर भोरे (वय ३०, रा. खराबवाडी, ता. खेड) याच्या ताब्यातील वाहनातून सहा व्यावसायिक गॅसने भरलेले सिलिंडर आढळून आले.
चौकशीत संबंधित गॅस सिलिंडर वाहतुकीसाठी आवश्यक परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी १९,२०० रुपये किमतीचे गॅस सिलिंडर आणि २.५० लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
बेकायदेशीर गॅस साठवणूक आणि वाहतुकीमुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारांवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.




Total Users : 227459