पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
पिंपरी परिसरात दुचाकीवरून प्रतिबंधित गुटख्याची विक्री करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सुमारे ४१ हजार ८९३ रुपयांचा तंबाखूजन्य माल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंदनगर कमान परिसरात गस्त घालत असताना एका संशयित तरुणाची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या पिशवीत शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.
याप्रकरणी जुबेर वली अहमद शेख (वय २५, रा. काळेवाडी) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा दुचाकीवरून परिसरात गुटखा विक्री करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी आरोपीकडून ४१,८९३ रुपये किमतीचा प्रतिबंधित तंबाखूजन्य माल जप्त केला असून त्याच्याविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासनाने बंदी घातलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू असून अशा बेकायदेशीर व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलिसांचे विशेष अभियान सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.



