spot_img
spot_img
spot_img

‘आम्हीच या भागाचे भाई’ म्हणत कोयत्याने हल्ला; चिखलीत तरुणावर जीवघेणा वार, चार अल्पवयीनांवर गुन्हा

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

चिखली परिसरात किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. “आम्ही या भागातील भाई आहोत” अशी दादागिरी करत चार विधीसंघर्षीत बालकांनी हा हल्ला केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. १५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शिवम मेडिकलसमोर, टॉवर लाईन, चिखली येथे घडली. या प्रकरणी आर्यन राजाराम चव्हाण (वय २०) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी आपल्या मित्रासह दुचाकीवरून घरी जात असताना रस्त्यात उभ्या असलेल्या चार अल्पवयीन मुलांना बाजूला होण्यास सांगितले. मात्र, याचाच राग येऊन आरोपींनी “तू आम्हाला ओळखत नाहीस का?” अशी दमदाटी करत वाद घातला.

यानंतर आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला पकडले. त्यावेळी दोन आरोपींनी जवळ लपवून ठेवलेला कोयता काढून, “तुला दाखवतो” असे म्हणत फिर्यादीच्या डोक्यावर व दोन्ही हातांवर सपासप वार केले. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला.

घटनेदरम्यान स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून आले असता आरोपींनी कोयता हवेत फिरवत “कोणी मध्ये पडू नका, नाहीतर सोडणार नाही” अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली आणि तेथून पळ काढला.

या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (२), ३ (५) तसेच आर्म अॅक्ट व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी विधीसंघर्षीत बालक असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिळीमकर करत असून, वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!