spot_img
spot_img
spot_img

८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रविकासाची शपथ! महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण

शबनम न्यूज | प्रतिनिधी

“स्वातंत्र्य म्हणजे केवळ आपल्याला मिळालेला अधिकार नसून राष्ट्र आणि समाजाप्रती असलेली मोठी जबाबदारीदेखील आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा विकास करताना प्रत्येक नागरिकाला दर्जेदार मूलभूत सुविधा, पारदर्शक प्रशासन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुलभ सेवा उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता आहे. स्वातंत्र्याची मूल्ये जपत लोककल्याण, पर्यावरण संवर्धन, महिला सन्मान आणि सर्वसमावेशक विकासाचा ध्यास घेऊन पिंपरी-चिंचवडला देशातील आदर्श शहर बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण आणि देशभक्तिमय वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि राष्ट्रनिर्मितीसाठी योगदान देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात वीरांच्या बलीदान,समर्पण व त्यागाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करताना महापौर लांडगे हे बोलत होते.

या सोहळ्यास आमदार उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर,आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, माजी महापौर योगेश बहल, कला, क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, ‘ल’ प्रभाग अध्यक्ष रेखा देवकर, नगरसदस्य मधुरा शिंदे, वर्षा जगताप, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, मुख्य लेखा परिक्षक प्रमोद भोसले,मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे,सह आयुक्त मनोज लोणकर,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.लक्ष्मण गोफणे,मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरूडे,उप आयुक्त डाॅ.प्रदीप ठेंगल,अण्णा बोदडे, वेंकटेश दुर्वास,ममता शिंदे,चेतना केरूरे,सह शहर अभियंता मनोज सेठीया,अजय सुर्यवंशी,प्रेरणा सिनकर यांच्यासह महानगरपालिकेचे विविध विभागप्रमुख,अग्निशमन,आपत्ती व्यवस्थापन तसेच सुरक्षा अधिकारी, पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून उपस्थितांनी घेतल्या दोन सामूहिक शपथा :-

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी उपस्थितांनी महिलांना समानतेने, आदराने आणि संवेदनशीलतेने वागणूक देण्याची शपथ घेतली तसेच महिलांसाठी सुरक्षित आणि सन्मानजनक कार्यस्थळ निर्माण करण्यासोबतच पोश कायदा, पोश धोरण आणि शी-बाॅक्स पोर्टलबाबत व्यापक जनजागृती करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला याशिवाय विकसित, सक्षम आणि नागरिकाभिमुख पिंपरी-चिंचवडच्या निर्मितीसाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही देण्यात आली. शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच राष्ट्राच्या प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत माती आणि पाणी ही निसर्गाने दिलेली अमूल्य संपत्ती असल्याची जाणीव अधोरेखित करण्यात आली. पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे, जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश केवळ घोषणेपुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प उपस्थितांनी सामुहिक शपथ घेऊन केला.या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन व शपथेचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या नागरिकाभिमुख आणि डिजिटल प्रशासनाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘स्वागतम ई-प्रवेश’ या क्षेत्रीय कार्यालय प्रवेश प्रणाली सेवेचा ऑनलाइन शुभारंभ तसेच CSR पोर्टलचे उद्घाटन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. या सुविधांमुळे नागरिकांना महापालिकेच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक, गतिमान आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे.

“महापालिका भवनात नागरिकांना प्रवेशासाठी ‘ई-स्वागतम’ पास प्रणाली १ मे पासून सुरू करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर आज महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नागरिकांच्या प्रवेशासाठी ‘ई-स्वागतम’ पास प्रणाली विकसित करून तिचे लोकार्पण करण्यात आले आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रवेशासाठी सुलभ, पारदर्शक आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून, नागरिकांचा वेळ वाचण्यासोबतच कार्यालयीन कामकाज अधिक सुव्यवस्थित होण्यास मदत होईल.”

डॉ. विजय सूर्यवंशी
आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

स्वातंत्र्याच्या मूल्यांचे जतन करत विकासाची नवी दिशा, लोककल्याणाचा ध्यास, पर्यावरणाप्रती जबाबदारी आणि नागरिकाभिमुख प्रशासनाची बांधिलकी यांचा समन्वय साधत अधिक सक्षम, सुंदर, सुरक्षित आणि विकसित पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने योगदान देण्याचे आवाहन आजच्या स्वातंत्र्यदिनी करण्यात आले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!