spot_img
spot_img
spot_img

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात स्वातंत्र्य दिन उत्साहात

शबनम न्यूज | प्रतिनिधी

‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांचा जयघोष, पारंपरिक वेशात नटलेले चिमुकले, मॅनेट कॅडेट्सची अभूतपूर्व कवायत आणि हजारो विद्यार्थ्यांच्या देशभक्तीने भारलेल्या वातावरणात येथील एमआयटी आर्ट, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या ‘मॅनेट’ इमारतीच्या प्रांगणात भारताचा ८०वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

मेजर जनरल डॉ. ताजुद्दीन म्हैसले, व्हीएसएम (निवृत्त) आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव (राज्ये) श्री. ए. अजय कुमार हे समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यासह, व्यासपीठावर एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनीता कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्रोवोस्ट प्रा. डॉ. सायली गणकर, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, डॉ. नचिकेत ठाकूर, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, मॅनेटचे प्राचार्य कॅप्टन प्रेरित मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना श्री. ए. अजय कुमार म्हणाले, “आपल्याकडे असणारे ज्ञान हीच आपली खरी संपत्ती असते. याच ज्ञानाच्या बळावर इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले. आजही पाश्चिमात्य देश त्यांच्याकडील ज्ञानाच्या बळावर आर्थिकदृष्ट्या जगावर प्रभाव निर्माण करताना दिसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यशाच्या मागे न धावता ज्ञान मिळविण्यावर भर द्यावा. त्या ज्ञानाचा वापर देशाच्या विकासासाठी करावा. यश आपोआप आपल्या पाठीशी येईल,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मेजर जनरल डॉ. म्हैसले याप्रसंगी म्हणाले, “भारताने गेल्या ७९ वर्षांत सर्वच क्षेत्रांत मोठी झेप घेतली आहे. आता भारत विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांची आवश्यकता आहे. सध्या विद्यार्थ्यांसमोर लक्ष विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. मात्र, विद्यार्थ्यांनी आपण देशाच्या विकासात आणि भारताला विकसित राष्ट्र बनविण्यात कसा वाटा उचलू शकतो, यावर लक्ष केंद्रित करावे. तसेच, एआय ही भविष्यातील समस्या नसून एक संधी आहे. या तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांनी नवकल्पनांना वाव देण्यासाठी करावा,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

डॉ. मंगेश कराड यावेळी म्हणाले, “भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाही. अनेकांनी दिलेल्या बलिदानामुळे आज आपण इथे आहोत. त्यामुळे आजच्या दिवशी स्वातंत्र्यवीरांसह देशाच्या प्रगतीत हातभार लावणाऱ्या शेतकरी आणि कामगार वर्गाचेही स्मरण करायला हवे. स्वातंत्र्य दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नसून राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पाचा दिवस आहे. आजच्या युवकांनी नवनवीन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोन्मेष आत्मसात करून भारताच्या विकासाला गती द्यावी. ज्ञान, कौशल्य आणि राष्ट्रनिष्ठेच्या बळावर युवकांनी आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी योगदान द्यावे आणि भारताला जगातील अग्रगण्य महासत्ता बनविण्याचे स्वप्न साकार करावे,” असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळ्याने झाली. त्यानंतर मॅनेट कॅडेट्सची बँडसह शिस्तबद्ध परेड, एमआयटी राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) कॅडेट्सनी राष्ट्रध्वजाला दिलेली मानवंदना, एमआयटी विश्वशांती गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले बहारदार नृत्य आणि एमआयटी संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तिपर गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थीनी नंदिनी गुप्ता यांनी केले, तर आभार विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुराज भोयार यांनी मानले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!