spot_img
spot_img
spot_img
spot_img

प्रदोष समयी’ अरंगेत्रम सोहळा उत्साहात संपन्न

पदन्यास नृत्यालयाच्या तीन विद्यार्थिनींच्या भरतनाट्यम सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध

चिंचवड, प्रतिनिधी : पदन्यास नृत्यालयाच्या आचार्या सपना रबडे सस्तकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रथम नृत्यशिक्षिका चैताली जगताप-केणी यांच्या अथक परिश्रमातून साकारलेला ‘प्रदोष समयी’ अरंगेत्रम सोहळा रविवारी (दि. २६ जुलै २०२६) सायंकाळी ६ वाजता चिंचवड येथील एलप्रो ऑडिटोरियममध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याला सुमारे ६१५ आप्तेष्ट, पालक व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रथमेश टोले गुरुजी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी भरतनाट्यममधील सातत्यपूर्ण साधना, शिस्त आणि समर्पणाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

या अरंगेत्रम सोहळ्यात गेली १४ वर्षे भरतनाट्यमचे शिक्षण घेत असलेल्या कल्याणी प्रदीप सोमवंशी यांनी प्रभावी शिवस्तुती सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गेली १३ वर्षे नृत्यसाधना करणाऱ्या रिद्धी मयुरेश बुरडे यांनी राजराजेश्वरी स्तुती, तर साक्षी अशोक भगत यांनी भावपूर्ण रामभजन सादर करून रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळवली.

अनेक वर्षांच्या कठोर नृत्यसाधनेचा परिपाक असलेल्या या अरंगेत्रम सोहळ्यात तिन्ही विद्यार्थिनींनी आपल्या नृत्यकलेची, शिस्तीची आणि समर्पणाची उत्कृष्ट झलक सादर केली. कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन, आकर्षक सादरीकरण आणि कलात्मक मांडणीमुळे संपूर्ण सोहळा संस्मरणीय ठरला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवर, पालक आणि रसिकांनी आचार्या सौ. सपना रबडे सस्तकर तसेच प्रथम नृत्यशिक्षिका चैताली जगताप-केणी यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. विद्यार्थिनींच्या उज्ज्वल कलाप्रवासासाठी सर्व उपस्थितांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!