शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभाग आणि पिंपरी-चिंचवड सोशल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने, आमदार उमा खापरे यांच्या सहकार्याने रामकृष्ण मोरे नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय ‘नारी शक्ती महोत्सव २०२६’ ला महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक स्पर्धा, महिला सन्मान आणि सुरेल संगीताने सजलेल्या या महोत्सवाने पिंपरी-चिंचवडमध्ये महिला सक्षमीकरणाचा प्रेरणादायी संदेश दिला.
महोत्सवाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. त्यानंतर विठुरायांच्या वारीचे देखणे सादरीकरण करून कार्यक्रमाला भक्तिमय वातावरण लाभले. शहराचे प्रथम नागरिक महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी उपमहापौर शर्मिलाताई बाबर, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, पिंपरी-चिंचवड सोशल क्लबचे सर्वेसर्वा प्रवीण तुपे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महोत्सवाचे प्रास्ताविक आमदार उमा खापरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जयदीप खापरे यांनी केले.

पहिल्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या भजन स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तब्बल ३५ भजनी मंडळांतील ४९६ महिलांनी सहभाग नोंदवत आपल्या सुरेल भक्तिगायनाने उपस्थितांची मने जिंकली.
दुसऱ्या दिवशी पारंपरिक मंगळागौर खेळ स्पर्धा रंगली. या स्पर्धेत १५ संघांमधील सुमारे १७५ महिलांनी सहभाग घेतला. त्याचबरोबर पोवाडा, गणेश वंदना, पारंपरिक नृत्य आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी संपूर्ण सभागृह उत्साहाने भारावून गेले. महिलांनी आपल्या कला, संस्कृती आणि परंपरेचे प्रभावी दर्शन घडवले.
महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये भाजी विक्रेती कलावती कसबे, टेल्को कर्मचारी अलका मुंडेकर, गृहिणी श्वेता राऊत, वडापाव व्यावसायिक इंद्रायणी माटे, मुख्याध्यापिका सारस सीना, हर्षा जोशी, अंजली कलमदळी, आर्किटेक्ट, नेत्रतज्ज्ञ डॉ. रोहिणी नाईक, सफाई कर्मचारी जयश्री दौंडकर, नर्स मनीषा मेटे, पायलट निधी अग्रवाल, तसेच शोभा मोहोळ, स्वरूपा देशपांडे, सुचेता गांगल, सानवी नलावडे, भारती कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला आणि मुलींचा गौरव करण्यात आला.
समारोप सोहळ्यास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चिंचवडचे आमदार शंकर जगताप, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, शहरातील नगरसेवक-नगरसेविका तसेच महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
समारोपपर भाषणात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करत, मुलींच्या शिक्षणासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. पिंपरी-चिंचवडमधील महिलांनी समाजजीवनात घेतलेली आघाडी आणि विविध क्षेत्रांतील त्यांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविकात आमदार उमा खापरे म्हणाल्या, “ज्या महिलांना आजवर मोठ्या व्यासपीठावर येण्याची संधी मिळाली नव्हती, अशा महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत महिलांचा सन्मान पोहोचवणे, हा या नारी शक्ती महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. विविध क्षेत्रांतील महिलांनी या महोत्सवात उत्साहाने सहभाग घेतला, हीच या उपक्रमाची खरी यशस्वीता आहे.”
या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी जयदीप खापरे, जागृती खापरे, अर्चना गोमकाळे, डॉ. जगताप, कविता, नीता कुशारे, वर्षा धारणे, स्मिता कदम, डॉ. संजीवनी पांडे, आशा काळे, प्रतिभा कुलकर्णी, प्रदीप साळवे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.
महोत्सवाची सांगता प्रसिद्ध अभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकर आणि गायक संदीप उबाळे यांच्या सुरेल गीतांनी झाली. त्यांच्या दमदार सादरीकरणाने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले आणि तीन दिवसांच्या या भव्य ‘नारी शक्ती महोत्सव २०२६’ ची अविस्मरणीय सांगता झाली.



