शबनम न्यूज | प्रतिनिधी
मामुर्डी येथील सीजी ४/१६१ आरक्षणाच्या जागेवरील स्मशानभूमीचा प्रश्न तातडीने मार्गी लावून नागरिकांना आवश्यक प्राथमिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नगरसेविका रेश्मा बापूजी कातळे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
मामुर्डी परिसरातील सदर आरक्षित जागेवर सध्या नवीन पुलाचे बांधकाम सुरू असल्याने स्मशानभूमीची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, याबाबत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

रेश्मा कातळे यांनी स्मशानभूमीचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागेपर्यंत नागरिकांच्या सोयीसाठी पाणी, वीज, स्वच्छता, अंत्यविधीसाठी आवश्यक जागा आणि इतर मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि अंत्यसंस्कारासाठी आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.



