spot_img
spot_img
spot_img
spot_img

प्रभागातील नागरी समस्या तातडीने सोडवा – सभापती अभिषेक बारणे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थेरगाव येथील ‘ग’ (पुरंदर) क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग समितीची बैठक स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरुवारी (ता. 30) पार पडली. बैठकीत प्रभागातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. तसेच, नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध नागरी समस्यांवर चर्चा करून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सभापती बारणे यांनी सूचना केल्या.

प्रभाग समिती अध्यक्षांच्या निवडीनंतर पहिलीच बैठक असल्याने सभापती बारणे यांनी सर्व सदस्यांना सभा कामकाजाची यावेळी माहिती समजवून सांगितली. प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, जलनिस्सारण, सार्वजनिक सुविधा तसेच सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. नागरिकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विकासकामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

यावेळी सभापती बारणे यांनी प्रभाग समितीच्या नवनियुक्त अध्यक्षा मनिषा पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा देत प्रभागाच्या विकासासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. कोण कुठल्या पक्षाचा यापेक्षा नारिकांचे प्रश्न किती महत्वाचे आहेत, यावर लक्ष केंद्रीत करुन नागरिकांना सुविधा देण्याची ही संधी आहे. त्यामुळे प्रभाग समितीचे कामकाज सकारात्मक चर्चेतून अधिक प्रभावीपणे पार पाडेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नागरिकांच्या अपेक्षांनुसार विकासकामांना गती देत अधिक सक्षम आणि सुविधायुक्त प्रभाग उभारण्यासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचे सभापती बारणे यांनी सांगितले. या बैठकीस प्रभागातील नगरसेवक, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच विविध शाखांचे कर्मचारी उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!