पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालयासमोर १२ जून रोजी आयोजित करण्यात आलेले मुस्लिम समाजाचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती मुस्लिम समाज, पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याचे अध्यक्ष सय्यद हाजी गुलाम रसूल यांनी दिली.
अवैध धार्मिक स्थळांबाबत राज्य शासनाने धोरण निश्चित करून प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्र आढावा घ्यावा व नियमितीकरणासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम आखावा, या मागणीसंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. विजयकुमार सुर्यवंशी यांनी सकारात्मक भूमिका घेत सहमती दर्शविल्याने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याबाबत पिंपरी व संत तुकारामनगर पोलीस ठाण्यांना लेखी निवेदन देण्यात आले असून, आंदोलनाची स्थगिती शांततापूर्ण पद्धतीने आणि कायदा-सुव्यवस्थेचा पूर्ण आदर राखून करण्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.


