पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी एका मोठ्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी सिंडिकेटचा पर्दाफाश करत दुबई आणि थायलंडमधून भारतातील नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अखेर अटक केली आहे. इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीस आणि लूकआऊट सर्क्युलरच्या आधारे थायलंडमधील बँकॉक विमानतळावर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर भारतात आणून अधिकृत अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सौरभ उर्फ गणेश बाळासो काळे असे असून, तो आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेटचा प्रमुख सदस्य असल्याचे तपासात उघड झाले आहे.
तीन मोठ्या सायबर गुन्ह्यांशी संबंध
तपासादरम्यान आरोपीचा संबंध खालील गाजलेल्या सायबर गुन्ह्यांशी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
– देहूरोड पोलीस ठाणे गु.र.नं. २९३/२०२४ – ऑनलाइन टास्क फ्रॉड
– हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. ७७०/२०२४ – शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली १८ लाखांची फसवणूक
– सायबर पोलीस ठाणे गु.र.नं. १२/२०२५ – शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल २ कोटी ६६ लाख रुपयांची फसवणूक
दुबईत बसून चालवत होता सायबर साम्राज्य
जून २०२४ मध्ये देहूरोड पोलीस ठाण्यातील गुन्ह्याच्या तपासात सायबर पोलिसांनी १३ आरोपींना अटक केली होती. चौकशीतून आरोपी गणेश काळे याचे नाव पुढे आले. तो दुबईमध्ये राहून भारतातील विविध बँक खात्यांचा वापर सायबर फसवणुकीतून आलेला पैसा स्वीकारण्यासाठी आणि वळवण्यासाठी करत असल्याचे उघड झाले.
तपासात असेही समोर आले की, आरोपीने दुबईमध्ये स्वतःचे कार्यालय उभारले होते. भारतातील बनावट अथवा भाड्याने घेतलेल्या बँक खात्यांची माहिती, एटीएम कार्ड, चेकबुक, इंटरनेट बँकिंग आयडी आणि पासवर्ड यांचा वापर करून तो मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार हाताळत होता.
चीनसह परदेशी नागरिकांशी थेट संपर्क
सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांनी केलेल्या तांत्रिक तपासातून आरोपीचे चीन आणि इतर विदेशी नागरिकांशी थेट संबंध असल्याचे निष्पन्न झाले. या नेटवर्कच्या मदतीने तो टास्क फ्रॉड, शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट फ्रॉड, डिजिटल अरेस्ट आणि इतर सायबर गुन्ह्यांद्वारे भारतीय नागरिकांची फसवणूक करत होता.
प्रत्यार्पण प्रक्रिया सुरू असतानाच बँकॉकला पलायन
महाराष्ट्र शासनामार्फत केंद्रीय गृह मंत्रालयाकडे आरोपीविरुद्ध प्रत्यार्पण प्रस्ताव पाठविण्यात आला होता. दुबईमधील भारतीय दूतावासामार्फत त्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू असतानाच सप्टेंबर २०२५ मध्ये आरोपी दुबई सोडून थायलंडमधील बँकॉक येथे फरार झाला.
इंटरपोलच्या मदतीने सापळा
आरोपीचा माग काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी महाराष्ट्र शासन आणि केंद्रीय गृह मंत्रालयाशी सातत्याने समन्वय ठेवला. त्यानंतर आरोपीविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस आणि लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले.
दरम्यान, आरोपी दुसऱ्या देशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर थायलंडमधील सुरक्षा यंत्रणांनी बँकॉक विमानतळावर त्याला ताब्यात घेतले.
मुंबई विमानतळावर घेतला ताबा
दिनांक ११ जून २०२६ रोजी आरोपीला भारतात आणण्यात आले. मुंबई विमानतळावर सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस हवालदार हेमंत खरात आणि पोलीस शिपाई नितेश बिचेवार यांच्या पथकाने त्याचा अधिकृत ताबा घेतला. त्यानंतर देहूरोड पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली.
इतर राज्यांतील गुन्ह्यांचीही उकल
आरोपीच्या अटकेमुळे देशातील विविध राज्यांमधील अनेक सायबर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामध्ये मुंबई आणि तेलंगणातील अनेक गंभीर फसवणूक प्रकरणांचा समावेश आहे.
पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपआयुक्त रोहीदास पवार, तत्कालीन पोलीस उपआयुक्त संदीप डोईफोडे, डॉ. शिवाजी पवार तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण, पोलीस कर्मचारी दिपक भोसले, हेमंत खरात, नितेश बिचेवार, अतुल लोखंडे आणि सायबर पोलीस ठाण्याच्या संपूर्ण पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.
सायबर गुन्हेगारांचा आंतरराष्ट्रीय अड्डा उद्ध्वस्त
दुबई आणि थायलंडमधून भारतातील नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या सायबर रॅकेटचा प्रमुख सूत्रधार अटकेत आल्याने कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीमागील मोठे आंतरराष्ट्रीय नेटवर्क उघडकीस येण्याची शक्यता असून, तपास यंत्रणांसाठी ही मोठी यशस्वी कारवाई मानली जात आहे.


