पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ड प्रभाग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पिंपळे गुरव वॉर्डातील अतिक्रमण विरोधी विभागात कार्यरत असलेल्या बीट निरीक्षकाला ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अॅन्टी करप्शन ब्युरो (एसीबी) पुणे पथकाने गुरुवारी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उमेश अरुण लोंढे (वय २८) हे ड प्रभाग क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (वर्ग-३) म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदाराची पिंपळे गुरव येथे एक गुंठा जागा असून त्या ठिकाणी त्यांनी तीन मजली इमारत उभारली होती. संबंधित बांधकामासाठी महापालिकेची पूर्वपरवानगी घेतली नसल्याने ते अनधिकृत असल्याचे नमूद करत महापालिकेने २५ फेब्रुवारी २०२६ रोजी नोटीस बजावली होती.
या नोटिशीविरोधात तक्रारदाराने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने तक्रारदाराला नियमानुसार दंड भरून बांधकाम नियमित करण्यासाठी महापालिकेकडे अर्ज करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार तक्रारदाराने महापालिकेकडे बांधकाम नियमितीकरणाचा अर्ज दाखल केला होता.
दरम्यान, आरोपी उमेश लोंढे यांनी ८ जून रोजी तक्रारदाराशी संपर्क साधून त्यांच्या इमारतीबाबत तक्रारी असल्याचे सांगितले. तसेच बांधकाम अनधिकृत असल्याने ते पाडावे लागेल, अशी भीती दाखवून अतिक्रमण विभागाकडून कारवाई टाळण्यासाठी ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने ९ जून रोजी अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे येथे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. ११ जून रोजी पंचांसमक्ष झालेल्या पडताळणीत आरोपीने ७० हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ड प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या पार्किंगमध्ये सापळा राबविण्यात आला. यावेळी आरोपी उमेश लोंढे यांनी तक्रारदाराकडून ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना सायंकाळी ५.३५ वाजता रंगेहात पकडले.
या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश वाळके व पोलीस निरीक्षक प्रवीण निबाळकर यांच्या पथकाने केली.
दरम्यान, शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी तात्काळ अॅन्टी करप्शन ब्युरोशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.


