पिंपरी | प्रतिनिधी युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळातील कथित भ्रष्टाचार, भोंगळ कारभार आणि महापालिकेच्या खासगीकरणाच्या प्रयत्नांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. पुनावळे येथील मनपा शाळेचे आरक्षण खासगी संस्थेला देण्याचा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष चेतन पवार यांनी दिला.
शुक्रवारी पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, शहर समन्वयक कैलास नेवासकर, शहर कार्यालय सचिव ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
चेतन पवार म्हणाले की, पुनावळे येथील मनपा शाळेचे आरक्षण खासगी संस्थेला देण्याचा प्रस्ताव हा गरीब व सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्कावर गदा आणणारा आहे. संबंधित जागेवर महापालिकेने स्वतःची दर्जेदार शाळा उभारून विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. शाळेची जागा खासगी संस्थेला देणे म्हणजे महापालिकेच्या शिक्षण व्यवस्थेचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी त्यांनी ईस्ट ऑक्सफर्ड इंटरनॅशनल फाउंडेशनला भाडेकराराद्वारे जागा देण्याच्या प्रस्तावावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भूमी आणि जिंदगी विभागाने प्रती चौरस फूट केवळ ३ रुपये ६० पैसे इतका भाडेदर कोणत्या निकषांवर निश्चित केला, याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी प्रक्रियेतही अनियमितता झाल्याचा आरोप करत, कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता जगदंब महिला रेडीमेड ड्रेसेस यांना काम देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणातील निर्णय रद्द करून पारदर्शक निविदा प्रक्रिया राबवावी, अशी मागणीही त्यांनी केली.
पवना नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करताना पवार यांनी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकला जात असून त्यामुळे नदीचे नैसर्गिक स्वरूप बदलत असल्याचा आरोप केला. काही ठिकाणी सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याने प्रदूषण वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच रावेत परिसरातील पुलाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
ताथवडे येथील सर्व्हे क्रमांक ६४/२/१ मधील विकास प्रकल्पावरही त्यांनी आक्षेप घेतला. नगररचना विभागाच्या अभिप्रायात नाला दर्शविण्यात आलेला असताना बांधकाम आराखडा मंजूर करताना त्याचे स्वरूप बदलण्यात आल्याचा आरोप करत संबंधित बांधकाम परवाना रद्द करण्याची मागणी त्यांनी केली.
याशिवाय, ताथवडे गावातील जिल्हा परिषद शाळा २०१३ च्या शासन आदेशानुसार महापालिकेकडे वर्ग होणे अपेक्षित असताना अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. हा मनमानी कारभार थांबवून तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा चेतन पवार यांनी दिला.


