पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
चऱ्होली बुद्रुक येथील ग्राम महसूल कार्यालयातील तलाठी सुनील सातोसे आणि त्याचा साथीदार नेमाजी भोकरे यांना वारस नोंद करून देण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी रंगेहात पकडले.
तक्रारदाराच्या आजोबांच्या वडिलोपार्जित जमिनीवरील वारस नोंद ७/१२ उताऱ्यावर करण्यासाठी सुरुवातीला तब्बल १ लाख ८० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर ही रक्कम ८० हजारांवर आणि पुढे ७० हजारांवर आली. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केल्यानंतर पडताळणीत लाच मागणी स्पष्ट झाली.
एसीबीने ८ जून रोजी सापळा रचला. तलाठी सातोसे यांच्या सांगण्यावरून खासगी इसम नेमाजी भोकरे याने तक्रारदाराकडून ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताच दुपारी ३.१२ वाजता दोघांनाही चऱ्होली बुद्रुक ग्राम महसूल कार्यालयात रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीकडून करण्यात येत आहे.
“शासकीय कामासाठी कोणीही कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त पैशांची मागणी करत असल्यास नागरिकांनी तत्काळ एसीबीशी संपर्क साधावा,” असे आवाहन एसीबीच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.


