पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
तळेगाव दाभाडे परिसरात सार्वजनिक ठिकाणी वेश्याव्यवसायासाठी ग्राहकांना आकर्षित करत असल्याच्या आरोपावरून एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जून रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास जुना पुणे-मुंबई महामार्गावरील सीआरपीएफ गेट क्रमांक ३ समोरील वडाच्या झाडाखाली संबंधित महिला संशयास्पदरीत्या उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
तपासादरम्यान संबंधित महिला वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून तसेच शब्दांद्वारे ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आले. तिच्या या कृत्यामुळे रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होत होता तसेच सार्वजनिक शिष्टाचार आणि सभ्यतेचा भंग होत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम, १९५६ च्या कलम ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


