पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
एमआयडीसी भोसरी पोलिसांनी मोशी परिसरात कारवाई करत विदेशी दारूची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत हजारो रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जून रोजी दुपारी खडी मशीन रोडवरील हॉटेल अजिंक्यतारा समोरील टपरीजवळ उपेंद्र विक्रमा गुप्ता (वय ३०) हा विदेशी दारूची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकण्यात आला असता आरोपीकडे ६ हजार ७३० रुपये किमतीची विदेशी दारू आढळून आली.
तपासादरम्यान संबंधित मद्यसाठा विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या जवळ बाळगल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मद्यसाठा जप्त करून आरोपीविरोधात कारवाई केली.
याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीचा शोध घेतला जात आहे.


