शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवना नदीकाठी सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी एका अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ती घटनास्थळावरून फरार झाली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मे २०२६ रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मौजे शिरगाव गावाच्या हद्दीत पवना नदीच्या कडेला ही कारवाई करण्यात आली. आरोपी महिला जमिनीतील खड्ड्यात ताडपत्री टाकून त्यामध्ये गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळमिश्रित कच्चे रसायन भिजवत असल्याचे आढळून आले.
पोलिसांची चाहूल लागताच संबंधित महिला घटनास्थळावरून पळून गेली. कारवाईदरम्यान सुमारे १० हजार लिटर गुळमिश्रित कच्चे रसायन जप्त करण्यात आले. या मालाची अंदाजे किंमत ३ लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुनिल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (क) व ६५ (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरगाव पोलिसांकडून सुरू आहे.


