शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट-३ पथकाने चाकण दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर कारवाई करत ४० हजार रुपये किमतीचे रसायन नष्ट केले. या प्रकरणी एका महिलेविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.४० वाजण्याच्या सुमारास मौजे बहुळ गावातील पठारे वस्ती, ता. खेड, जि. पुणे येथे ही कारवाई करण्यात आली. संबंधित महिला आरोपीने तीन पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक ड्रममध्ये गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे उग्र वासाचे रसायन भिजत घातल्याचे आढळून आले.
कारवाईदरम्यान तीन ड्रममध्ये साठवून ठेवलेले सुमारे ८०० लिटर रसायन जप्त करण्यात आले. पंचांसमक्ष हे रसायन आणि संबंधित साहित्य जागीच नष्ट करण्यात आले. परिसरात चौकशी केली असता, संबंधित प्लास्टिक ड्रम महिला आरोपीच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी पोलीस शिपाई निखिल माणिक फापाळे (गुन्हे शाखा, युनिट-३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (क) व ६५ (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेला भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.


