पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
खेड तालुक्यातील निघोजे परिसरात एका खासगी कंपनीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उशिरा कामावर आल्याबाबत रागावल्याच्या कारणावरून संतप्त कर्मचाऱ्याने थेट वरिष्ठ अधिकाऱ्यावर हातोड्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दक्षिण म्हाळुंगे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण ज्ञानेश्वर बोबडे (वय ३४, रा. देहुगाव) हे संदिप टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीत कार्यरत आहेत. दि. २० मे रोजी सकाळी कंपनीतील केबिनमध्ये असताना आरोपी योगेश चंद्रकांत माने (रा. बेळगा, ता. उमरगा, जि. धाराशिव) याने उशिरा कामावर आल्याबद्दल फिर्यादींनी रागावल्याचा मनात राग धरला होता.
याच कारणातून संतप्त झालेल्या आरोपीने हातातील हातोड्याने प्रविण बोबडे यांच्या डोक्याच्या मागील बाजूस जोरदार प्रहार करत गंभीर जखमी केले. तसेच त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात बीएनएस कलम १०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोउपनि जायभाये करीत आहेत.


