राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात क्लेश आंदोलन
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे जिल्हय़ातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना घडली आहे.सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर 65 वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या घटनेमुळे राज्यभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून,या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली डेक्कन येथील गुडलक चौकात क्लेश आंदोलन करण्यात आले. नराधम आरोपीला फाशी द्यावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्या,अशा घोषणा देखील यावेळी आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आल्या.
यावेळी अध्यक्ष श्रीकांत पाटील म्हणाले,राज्यभरातील महिला,तरुणी आणि लहान मुली सुरक्षित नसल्याचे आजवरच्या घटनांमधून स्पष्ट झाले आहे.या घटनांकडे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे गांभिर्याने लक्ष देताना दिसत नसून ते केवळ भाषणबाजी करताना दिसतात.ही निषेधार्थ बाब आहे.
त्याच दरम्यान दोन दिवसांपूर्वी नसरापूर येथे 4 वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याची घटना घडली.ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, राज्यातील महिला,तरुणी आणि लहान मुलीना सुरक्षा देण्यात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे अपयशी ठरले आहे.यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा,ही आमची मागणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.




