spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवड पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’; अनधिकृत भाडेकरूंविरोधात एप्रिलमध्ये ३८ गुन्हे दाखल

प्रतिनिधी – युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड (दि. १ मे २०२६) – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेत ‘ॲक्शन मोड’मध्ये काम सुरू केले आहे. भाडेकरूंची माहिती पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक असतानाही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या घरमालकांवर कारवाई करण्यात येत असून, एप्रिल २०२६ महिन्यात अशा एकूण ३८ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ च्या कलम १६३ अन्वये घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची संपूर्ण माहिती व कागदपत्रे नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करणे आवश्यक आहे. या नियमाचे पालन होत आहे का, याची पडताळणी करण्यासाठी आयुक्तालय स्तरावरील दहशतवाद विरोधी शाखा (ATB) तसेच पोलीस स्टेशन स्तरावरील दहशतवाद विरोधी कक्ष (ATC) यांच्या माध्यमातून एप्रिल महिन्यात विशेष शोध मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान अनेक ठिकाणी अनधिकृतरीत्या राहणारे भाडेकरू आढळून आले. त्यानुसार संबंधित घरमालकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता-२०२३ च्या कलम २२३ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांकडून नागरिकांना स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या घरात राहणाऱ्या भाडेकरूंची संपूर्ण माहिती व कागदपत्रे तत्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये सादर करावीत. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. तसेच परिसरात कोणी संशयास्पद व्यक्ती अथवा अनधिकृतपणे राहत असलेले परदेशी नागरिक आढळल्यास त्याबाबत त्वरित माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड तसेच पोलीस उपआयुक्त (विशेष शाखा) प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखा (ATB) व स्थानिक पोलीसांच्या दहशतवाद विरोधी कक्षांनी संयुक्तपणे राबविली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!