तब्बल ५५० किमीपर्यंत सीसीटीव्ही फुटेजचा माग काढत परराज्यातील आरोपी जेरबंद
प्रतिनिधी – युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत गुन्हे शाखा युनिट-३ने घरफोडी प्रकरणात उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ५५० किमीपर्यंत सीसीटीव्ही फुटेजचा माग काढत परराज्यातील आरोपींना जेरबंद केले. या कारवाईत गुन्ह्यात वापरलेली कार तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ३० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या संदर्भात चाकण येथील चाकण उत्तर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नं. ३५७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (४), ३०५, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. फिर्यादी भरत सुमेरमल वंजारा (वय ३५, व्यवसाय – ज्वेलर्स, रा. चाकण) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. २२ एप्रिल २०२६ रोजी रात्री ते २३ एप्रिलच्या पहाटे दरम्यान फुले चौकाजवळील ‘श्री खिमत ज्वेलर्स’ या दुकानाचे शटर व आतील लोखंडी ग्रील गॅस कटरने कापून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ७७ लाख २२ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केली होती.
या गंभीर गुन्ह्याचा तपास तातडीने उघड करण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक संशयित कार नाशिकच्या दिशेने जाताना आढळली. या वाहनाचा माग काढत सुमारे ५५० किमीपर्यंत गुजरात राज्यापर्यंत तपास करण्यात आला.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी राजस्थान व गुजरात येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सापळा रचून गुजरातमधून आरोपी हिम्मतकुमार रोशनजी साळवी (वय ३७, रा. अहमदाबाद), मुकेश ऊर्फ अजय भैरुलाल सालवी (वय २४), राधेशाम भैरुलाल सालवी (वय २२) व पुखराज ओमप्रकाश लौहार (वय २१, सर्व रा. राजस्थान) यांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपींनी त्यांच्या आणखी दोन साथीदारांसह कारने चाकण येथे येऊन चोरी केल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे, दुकानात काम करणारा किशन रामलाल सोनी (वय २२) यानेच चावी उपलब्ध करून दिल्यामुळे आरोपींना चोरी करणे सुलभ झाले असल्याचे समोर आले आहे.
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मारुती स्विफ्ट कार (किंमत ३ लाख रुपये), सुमारे २.९ किलो बेन्टेक्स दागिने (किंमत २० हजार रुपये) तसेच १७.८ किलो चांदीचे दागिने (किंमत २७ लाख रुपये) असा एकूण ३० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी व त्यांचे पथक करीत असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार व सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली आहे.




