पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
म्हाळुंगे : म्हाळुंगे परिसरात उघड्यावर फुटपाथवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे १०:१५ वाजण्याच्या सुमारास निघोजे गाव हद्दीत महिंद्रा कंपनी गेट क्रमांक २ समोर, स्वामी चहा जवळ फुटपाथवर हा प्रकार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून कारवाई करण्यात आली.
या कारवाईत आयुब युसुफ खान (वय ५५), गणेश सुरेश धोंगडे (वय २६) आणि सुनिल रज्जू साहू (वय २५) यांना जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आले. आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या ‘तीन पत्ते’ (फाईव्ह स्टार सोरट) जुगार खेळवत असल्याचे उघड झाले.
छाप्यात आरोपींकडून जुगाराचे साहित्य तसेच ३,२०० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई गुन्हे शाखा युनिट ४ चे पोलीस कर्मचारी अमोल वेताळ यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.




