spot_img
spot_img
spot_img

कोणीही वंचित राहू नये म्हणून डीपीवरील सुनावणी ३१ डिसेंबरपर्यंत घेणार

स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांची माहिती

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुधारित प्रारुप विकास योजना आराखड्यावर (डीपी प्लान) प्राप्त झालेल्या ५६ हजार ७७९ हरकतींवर सुनावणी वेळापत्रकानुसार पुढील आठवड्यात संपणार आहे. मात्र, एकही नागरिक सुनावणीपासून वंचित राहू नये. गोरगरीब व सर्वसाधारण लोकांवर अन्याय होऊ नये ते बेघर होऊ नये म्हणून सुनावणी डिसेंबरअखेरपर्यंत घेण्यात येणार आहे, असे स्थायी समितीचे अध्यक्ष तथा सुनावणी समितीचे सदस्य अभिषेक बारणे यांनी शनिवारी (दि.२८) सांगितले.

महापालिकेकडून सुधारित प्रारुप विकास योजना आराखडा १५ मे २०२५ ला प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यावर १४ जुलै २०२५ पर्यंत हरकती व सूचना स्वीकारण्यात आल्या. आराखड्यावर तब्बल ५६ हजार ७७९ जणांनी हरकती दाखल झाल्या आहेत. या हरकतींवर आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात तीन ऑगस्टपासून सात सदस्यीय समितीच्या माध्यमातून सुनावणी घेण्यात येत आहे. वेळापत्रकानुसार सुनावणी पुढील आठवड्यात संपणार आहे.

या बाबत स्थायी समितीचे अध्यक्ष बारणे म्हणाले की, डीपीवर तब्बल ५६ हजार ७७९ जणांनी हरकती दाखल केल्या आहेत. नोटीस न मिळाल्याने किंवा वेळ न मिळाल्याने सुनावणीस उपस्थित न झालेल्या नागरिकांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत सुनावणी घेतली जाणार आहे. तब्बल २५ वर्षांनंतर शहराचा सुधारित डीपी होत असून, कोणावर अन्याय होऊ नये, अशी भूमिका आहे. गोरगरीब व सर्वसामान्यांच्या घरे प्रस्तावित आरक्षणामुळे बाधित होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे.

त्यानंतर महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही स्वतंत्र सुनावणी घेऊन कोणते आरक्षण हवे, कोणते आरक्षण अनावश्यक आहे, याबाबत सूचना व हरकती घेतल्या जाणार आहेत. वेळ प्रसंगी सुनावणीसाठी आणखी एक ते दीड महिन्याची मुदतवाढ मागून घेण्यात येणार आहे. माझ्याप्रमाणे सर्व सात सदस्यांची अशी भावना आहे, असे बारणे यांनी सांगितले. संपूर्ण सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अहवाल तयार केला जाणार आहे. त्यानंतर तो अहवाल सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!