१३ मुलींसह ३७ मुलांना लाभ; ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ या भावनेतून स्तुत्य सामाजिक उपक्रम
पुणे : आर्थिक परिस्थिती आणि प्रवासाच्या अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत, तसेच त्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ व्हावा, या उद्देशाने फिनिक्स अग्निशिखा फाउंडेशनच्या वतीने ५० गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. गोखले इन्स्टिट्यूटच्या मैदानावर हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यामध्ये १३ मुली आणि ३७ मुलांना सायकली देण्यात आल्या.
फाउंडेशनचे संस्थापक संचालक मंगेश शिगवण यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फाउंडेशनचे सदस्य चेतनदादा वाघ, अमोल जरांडे, जय गवळी, दिनेश सकट, चेतन गोंडाळ, राकेश थोरात, मनीषाताई परांडे आणि रेणुकाताई पाटील उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना रेणुकाताई पाटील म्हणाल्या की, फिनिक्स अग्निशिखा फाउंडेशनचा हा उपक्रम केवळ सायकल वाटपापुरता मर्यादित नसून समाजाप्रती असलेल्या सेवाभावाचे प्रतीक आहे. गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा आणि सेवाभाव अधिक दृढ होतो. सामाजिक कार्य हे प्रसिद्धीसाठी नसून आत्मिक समाधानासाठी असते, अशी आमची भावना आहे.
संत एकनाथ महाराजांनी काशीहून रामेश्वरला जाताना वाटेत तहानेने व्याकूळ झालेल्या गाढवाला कावडीतील पाणी पाजून भूतदयेचा आदर्श घालून दिला. त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि संत गाडगेबाबा यांनी आपल्या कार्यातून समाजसेवेचा मार्ग दाखवला. या महापुरुषांचे विचार आणि कार्याचा वारसा पुढे नेणे हीच खरी ईश्वरसेवा आहे. ‘भूतदया हा श्रेष्ठ धर्म आणि जनसेवा हीच ईश्वरसेवा’ या विचारातूनच फाउंडेशनचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या समान संधी मिळाल्या पाहिजेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. सायकली मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात जाण्यासाठी होणारा प्रवास अधिक सोयीस्कर होणार असून त्यांचा वेळ आणि श्रम वाचण्यास मदत होणार आहे.
फिनिक्स अग्निशिखा फाउंडेशनच्या वतीने शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविले जात आहेत. भविष्यातही गरजू विद्यार्थी आणि वंचित घटकांना मदतीचा हात देत समाजोपयोगी उपक्रम सुरू ठेवण्याचा निर्धार फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आला.




Total Users : 245870