spot_img
spot_img
spot_img

चिंचवड मतदारसंघातील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार- आमदार शंकर जगताप

शबनम न्यूज | प्रतिनिधी

चिंचवड विधानसभा मतदारसंघामधील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकालात काढण्यासाठी चिंचवडमधील प्रमुख रस्ते आणि चौकांतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी चार महत्त्वाच्या प्रकल्पांच्या कामांना आमदार शंकर जगताप यांनी प्राधान्य दिले आहे. याच अनुषंगाने वाकड, चिंचवड, पिंपळे सौदागर आणि थेरगाव परिसरातील वाहतूक समस्या कमी करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पांसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या कामांमुळे आगामी काळात चिंचवड मतदारसंघातील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगतिले. 

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेने चार महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची निविदा प्रसिद्ध केली आहे. यामध्ये वाकड ते नाशिक फाटा रस्त्यावरील कल्पतरू चौकात सबवे उभारणे, चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ जुना रेल्वे उड्डाणपूल पाडून नवीन (रेल्वे ओव्हर ब्रिज) उड्डाणपूल बांधणे, पिंपळे सौदागर येथील पी. के. चौक सिग्नलमुक्त करणे आणि डांगे चौकातील ग्रेड सेपरेटरची लांबी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारसंघातील प्रमुख वाहतूक मार्गांवरील कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागामार्फत या कामांसाठी ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. वाकड ते नाशिक फाटा रस्त्यावरील कल्पतरू चौकात सबवे उभारल्यामुळे पिंपळे गुरव परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होईल. चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील जुना रेल्वे उड्डाणपूल पाडून नवीन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. पिंपळे सौदागर येथील पीके चौक सिग्नलमुक्त करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार असून, डांगे चौकातील ग्रेड सेपरेटरची थेरगाव फाट्याकडील लांबी वाढविण्यात येणार आहे.

या चारही प्रकल्पांमुळे वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, चिंचवड आणि थेरगाव परिसरातील वाहतुकीला दिलासा मिळणार आहे. विशेषतः ‘पीक अवर्स’च्या चौकांमधील सिग्नलवरील प्रतीक्षा वेळ कमी होऊन वाहनचालकांचा वेळ व इंधनाची बचत होण्यास मदत होणार आहे. महापालिकेने निविदा प्रसिद्ध केल्यामुळे आता या कामांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होणार आहे.  

“चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना दररोज भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, चिंचवड आणि थेरगाव या भागांतील वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन चार महत्त्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. कल्पतरू चौकातील सबवे, चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ नवीन उड्डाणपूल, पी. के. चौक सिग्नलमुक्त करणे आणि डांगे चौकातील ग्रेड सेपरेटरची लांबी वाढविणे या कामांमुळे वाहतूक अधिक वेगवान आणि सुरक्षित होण्यास मदत होईल. नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचावा, वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा आणि मतदारसंघातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम व्हावी, हाच या कामांमागील मुख्य उद्देश आहे.

  — शंकर जगताप
आमदार , चिंचवड विधानसभा मतदारसंघ 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!