शबनम न्यूज | प्रतिनिधी
राज्यातील पुणे आणि मुंबई या दोन मोठ्या शहरात येण्या जाण्यासाठी पिंपरी चिंचवड शिवाय पर्याय नसल्याने आणि एचए कंपनीमुळे भारताच्या नकाशावर हा परिसर आल्याने पिंपरी चिंचवड चा प्रवास १९५० नंतर वेगवान झाला असल्याचे प्रतिपादन इतिहास अभ्यासक विजय जगताप यांनी आज येथे केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या थेरगाव येथील पीएम श्री माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय व्याख्यानात “असं घडलं पिंपरी चिंचवड शहर” या विषयावर ते बोलत होते. प्रभारी उपशिक्षणाधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
आपल्या भाषणात जगताप म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहराला प्राचीन इतिहासाची पार्श्वभूमी असून स्वातंत्र्यपूर्व चळवळ, क्रांतिकारकांचे बलिदान तसेच येथील प्रत्येक गावांच्या असलेल्या ऐतिहासिक परंपरा, धार्मिक स्थळे ,ग्रामदैवते, संतपरंपरेचे अधिष्ठान आणि देहू व आळंदी या तीर्थक्षेत्रांच्या सान्निध्याने पावन झालेले राज्यातील हे एकमेव शहर असल्याचे त्यांनी म्हटले. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर अवघ्या दहा वर्षात येथे नगरपालिका झाली. त्यानंतरच्या बारा वर्षात लगेचच महानगरपालिका बनून अत्यंत वेगाने झपाट्याने विकसित झालेले देशातील दुसरे शहर म्हणून पिंपरी चिंचवडला आज ओळखले जात असल्याचे श्री जगताप यांनी नमूद केले . मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड यांनी पीएम श्री योजनेअंतर्गत शाळेला मिळालेल्या सन्मानाची व व्याख्यान आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इस्माईल मुल्ला यांनी केले तर रेश्मा जगताप यांनी आभार मानले.




Total Users : 245850